Homeशहरसरकारच्या कृपेने गावोगावी 'पार्थ पवार' : अठरा कोटी किंमतीच्या वर्ग दोनच्या जमीनिचा...

सरकारच्या कृपेने गावोगावी ‘पार्थ पवार’ : अठरा कोटी किंमतीच्या वर्ग दोनच्या जमीनिचा व्यवहार दोन कोटीत !

बेकायदेशीर पद्धतीने खरेदी खताची नोंदणी. ०१ कोटी ४४ लाखांचा मुद्रांक शुल्क बुडविला.

छत्रपती संभाजीनगर, दि. १८ [प्रतिनिधी] :- राज्याचे उप-मुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा महार वतन हाडोळी इनाम जमीन घोटाळा राज्यभर गाजत असतांनाच छत्रपती संभाजीनगर मधील गंगापूर येथे असाच एक जमीन घोटाळा झाल्याचे उघडकीस आले असून अनिल ठोंबरे नामक व्यक्तीने हा जमीन घोटाळा करतांना पार्थ पवारला ही मागे टाकले आहे.

पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात तरी सक्षम अधिकाऱ्याची मंजूरी होती. पण गंगापूर तालुक्यात जमीन घोटाळा करण्यासाठी खरेदीदार अनिल ठोंबरे यांनी सक्षम अधिकाऱ्याची मंजूरी घेण्याची तसदी ही घेतली नाही. तसेच सदर जमीनिचे खरेदी खत नोंदवितांना संबंधीत दुय्यम निबंधक वीर यांनी या जमीन घोटाळ्यास अधिकृत स्वरूप देतांना या जमीनिच्या खरेदी-विक्री व्यवहारास कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याची मंजूरी नाही, हे लक्षात येऊनही सदर खरेदी खताची नोंदणी केली. विशेष म्हणजे, या जमीनिच्या विक्रीस कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याची मंजूरी नसल्यामुळे खरेदी खताची नोंदणी ‘ऑनलाईन’ होणार नाही, हे लक्षात आल्यामुळे दुय्यम निबंधक वीर यांनी सदर जमीनिचे खरेदी खत ‘ऑफलाईन’ पध्दतीने नोंदवून घेतले. तसेच मुद्रांक शुल्क चोरीत ही पार्थ पवारचा कित्ता गिरवत खरेदीदार अनिल ठोंबरे यांनी शासनाचा अंदाजे ०१ कोटी ४४ लाखांचा मुद्रांक शुल्क बुडविला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गंगापूर तालुक्यातील मौ. भेंडाळा येथील गट नंबर २१४ मध्ये अब्दुल गणी फाजलखान यांची ३१ एक्कर १९ गुंठे शेत जमीन आहे. सदर शेत जमीन हैदराबाद इनामे व रोख अनुदान अधिनियम, १९५४ अंतर्गत ‘मदतमाश’ स्वरूपाची शेत जमीन आहे. “सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीशिवाय हस्तांतरणास बंदी” असा स्पष्ट उल्लेख संबंधीत जमीनिच्या सात-बाऱ्यावर आहे. पण जवळपास १८ कोटी रुपये बाजारमूल्य असलेल्या जमीनिची मालकी कवडीमोल भावात घेण्यासाठी निवृत्त तलाठी अनिल ठोंबरे आणि त्याचा सहकारी मयूर टेटवार यांनी दुय्यम निबंधक वीर यास हाताशी धरून बेकायदेशीर पद्धतीने खरेदी खत नोंदवून घेतले.

वर्ग २ च्या इनामी जमिनी विकण्यासाठी जिल्हाधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी किंवा तहसीलदारांची परवानगी आवश्यक असते. मात्र, कोणत्याही परवानगीविना पुणे महामार्गावर असलेल्या या जमीनिचा व्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय खरेदी खताची नोंदणी होऊ शकत नसल्याने दुय्यम निबंधक वीर यांनी ‘ऑफलाईन’ खरेदी खत नोंदणीची शक्कल लढविली आणि हा जमीन घोटाळा घडवून आणला. एकूणच सरकारच्या, सरकारी व्यवस्थेच्या ‘कृपेने’ गावोगावी ‘पार्थ पवार’ असल्याचे प्रमाण देणारा हा घोटाळा होय, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

वारसदारांचा आक्षेप 

दरम्यान जमीन मालक अब्दुल गणी यांचा मुलगा रशीद खान यांनी या जमीनिच्या खरेदी-विक्री व्यवहारास आक्षेप घेतला आहे. नियमानुसार वारसदारांच्या संमतीशिवाय कोणतेही खरेदी-विक्री व्यवहार केल्याजात नाहीत. पण या व्यवहारात जमीन मालक अब्दुल गणी यांचे वारसदार रशीद खान यांची संमती घेण्यात आली नाही. त्यामुळे ज्या दिवशी या जमीनिचा व्यवहार झाला त्याच दिवशी म्हणजे, दि. १७ नोव्हेंबर २०२५ रोजी वारसदार रशीद खान यांनी याबाबत तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी करून हा व्यवहार रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच गंगापूर पोलीस स्टेशन मध्ये पोलीस तक्रार करून हा जमीन घोटाळा करणाऱ्या अनिल ठोंबरे, दुय्यम निबंधक वीर आणि इतरांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची विनंती पोलीस अधिकाऱ्यांना केली आहे.

हेही वाचा

लक्षवेधी